‘शेतकरी आंदोलन’...संघाच्या हिंदुत्वाला आव्हान..!
लेखक : लोकनाथ काळमेघ
भारतात कायम भाकरीसाठी संघर्ष होत आलाय. आपल्या हक्काची लढाई प्रत्येकानेच आपापल्या परीने लढलीय. मात्र, १९२५ साली ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच संघर्षाची दिशा बदलली. भाकरीचा संघर्ष धार्मिक संघर्षात, पर्यायाने सांप्रदायिक दंगलींमध्ये परावर्तित झाला. संघर्षाची ही दोन टोके परस्पर भिन्न असल्यामुळे ती आजपर्यंतही जुळू शकली नाहीत. उदाहरणच पाहायचे झाल्यास, माजी प्रधानमंत्री व्ही.पी.सिंह हे देशभरातील ओबीसींच्या हक्काचा ‘मंडल आयोग’ अंमलात आणण्याचा निर्णय घेत असतानाच, लालकृष्ण अडवाणींनी कमंडलू काढून असा काही ‘हिंदुत्वाचा जादूटोणा’ केला की, ‘मंडल’पेक्षा ‘राम मंदिर’ हे जनतेला आपल्या फायद्याचे वाटू लागले. अर्थात, यामागे ‘मास्टर’ जरी अडवाणी हे वरकरणी दिसत असले, तरी त्यामागचे ‘माईंड’ हे आरएसएसचे होते. त्यावेळचे बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादवांनी धर्मांधतेची पायाभरणी करणाऱ्या अडवाणींना अटक करायचे धाडस केले नसते तर देशात तेव्हाच जागोजागी हिंस्र नंगानाच झाला असता. तरीही पुढे तो १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला. हे सगळे सांगण्याचे तात्पर्य हेच, की ‘सत्ता’ ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज आहे आणि ती भाकरीच्या लढाईने जिंकता येत नाही, म्हणून सांप्रदायिक दंगली घडवून ती मिळविण्यासाठी जनतेला सतत धार्मिक अफुचा अर्क पाजत राहायचे. तेव्हापासून ते आजही जेव्हा जेव्हा जनतेने पोटासाठी संघर्ष उभा केला, तेव्हा तेव्हा आरएसएसने तो भिन्न दिशेला वळविण्याचा प्रयत्न केला. आजही यापेक्षा काही वेगळे सुरू नाही.
सध्या दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पृष्ठभूमीवर अनेक वर्षांपासून पहिल्यांदा असे झाले किंवा होत आहे, की एखाद्या आंदोलनाला धार्मिक रंग चढविण्याचे आरएसएसचे प्रयत्न फोल ठरत आहेत. तसे प्रयत्न झालेदेखील. शेतकरी आंदोलनातील काही आक्रमक आंदोलकांनी २६ जानेवारीला लाल किल्ल्यावर तिरंग्याच्या बाजूला आणि ‘किसान एकता’च्या झेंड्याच्या शेजारी शिख संप्रदायाचा धार्मिक झेंडा ‘निशाण साहिब’ फडकावून हे आंदोलन केवळ शीखांपुरतेच मर्यादित दाखविण्याचा प्रयत्न झालाय. मात्र, या हिंसाचाऱ्यांचा म्होरक्या दीप सिद्धू हा भाजपशी आणि नरेंद्र मोदींशी संबंधित असल्याचं समोर आल्यामुळे भाजपचा चेहरा उघडा पडला.
आता प्रश्न असा आहे की आरएसएसचे जागतिकीकरण आणि खासगीकरणाबद्दलचे मत काय? तर काँग्रेस काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘भारतीय किसान संघ’, ‘भारतीय मजूर संघ’ आणि ‘स्वदेशी जागरण मंच’ या तीन मोठ्या संघटना ‘स्वदेशी’वर सर्वाधिक भर देत होत्या. आज अगदी उलट परिस्थिती आहे. मोदी सरकारने जीवन विमा क्षेत्रात ७४ टक्क्यांवर परदेशी गुंतवणुकीचा निर्णय घेतला. त्यावर ‘स्वदेशी’चे महत्त्व पटवून सांगणाऱ्या संघ परिवारातील स्वयंसेवक आता कुठल्या बिळात लपून बसलेत, हा संशोधनाचा भाग आहे. संरक्षण क्षेत्र, किरकोळ व्यापार क्षेत्र व बांधकाम विकास क्षेत्रात १००% थेट परकीय गुंतवणूक, एअर इंडियाचे खासगीकरण, वीज, रेल्वे, तेल, गॅस, अवकाश तंत्रज्ञान, औषधे, दूरसंचार, बँका इत्यादींचे खासगीकरण झपाट्याने वेग घेत असताना संघ परिवार मूग गिळून बसलाय. एकूणच युपीए सत्ताकाळातील संघ आणि आजचा संघ, यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.
‘हिंसा, पोलीस व्यवस्था, निर्बंध यांचे खासगीकरण’ असा संघ परिवाराचा खाक्या आहे. शाखेवरील लुटूपुटुची परेड असो, सांप्रदायिक दंगली असोत, अन्य उग्र हिंदुत्ववादी आंदोलने असोत, १९९० च्या दशकापासूनचे राम मंदिर आंदोलन असो, यामध्ये संघ परिवाराने नेहमीच आपली संघटनात्मक ताकद वाढवली आहे. त्याचबरोबर हिंदुत्व हे कायम राजकीय व्यवहाराच्या केंद्रस्थानी राहील याची व्यवस्था केली आहे. आरएसएसची गरज नेमकी काय आहे, तर ती फक्त ‘सत्ता’ आहे आणि त्यासाठी हिंदुत्वाचा आलेख वाढवत नेणे, हा संघाचा मुख्य अजेंडा आहे.
खरे तर आता परिस्थिती एका अर्थाने बदलली आहे. आज माध्यमांवर सकारात्मक आणि नकारात्मकसुद्धा, नुस्त शेतकरी आंदोलनाची चर्चा आहे. अयोध्येमध्ये श्रीरामांचे मंदिर निर्माणाधीन आहे. त्यासाठी आरएसएस-भाजपाने जरी देशभरातून या मंदिराच्या निर्माणासाठी निधी गोळा करण्याचा उपक्रम सुरू केला असला, तरी शेतकरी आंदोलनाचे ‘डायव्हर्जन’ होत नसल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कमालीचा गोंधळलेला दिसतोय. उलट हे आंदोलन इलेक्ट्रॉनिक-प्रिन्ट माध्यमे, सोशल मीडिया यातून जागतिक पातळीवर पोहोचले आहे आणि यावेळेस आरएसएसचे हिंदुत्ववादी राजकारण बिनमहत्वाचे ठरल्यामुळे संघाच्या शाखांमध्ये तितकीच अस्वस्थता जाणवतेय. त्याचबरोबर आंदोलनाला ‘काउंटर’ करणारे आरएसएसचे ‘राम मंदिर देणगी महानाट्य’ कुचकामी ठरल्यामुळे संघ स्वयंसेवकांनी सध्यातरी मौन धारण केलेय. त्यामुळे सध्या आरएसएसने शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया देणे थांबवले आहे. एकंदरीत दिल्लीत गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेले हे ‘शेतकरी आंदोलन’ संघाच्या हिंदुत्वाला आणि संघ स्वयंसेवकांना आव्हान देण्यात या सगळ्यात महत्वाची भूमिका बजावतेय. धर्मापेक्षा महत्त्वाचे आहे ‘पोट’ आणि हाच धडा इथून पुढे आता या शेतकरी आंदोलनापासून घेतला गेला पाहिजे.
Mob. - ९०९६४९४८९४
E-mail : loknathkalmegh@gmail.com
jhbjhvjvg

No comments:
Post a Comment